हा शिमगा कशासाठी ?
होलीकोत्सव... भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण. हा एकमेव असा सण आहे, ज्यामध्ये ईर्षा आणि उत्साह या दोन्ही परस्परविरोधी भावना एकमेकांच्या हातात हात घालुन वावरतात. त्याचा फायदा असा होतो की, आनंद व्यक्त करण्यासाठी जसा भरपुर उत्साह उपलब्ध असतो, तद्वतच 'बुरा न मानो होली है..' म्हटले की आपण सहजच ईर्षा, द्वेष, राग यासारख्या नकारात्मक भावनाही सहजच व्यक्त करून मोकळे होऊ शकतो. कदाचित म्हणुनच या सणाला 'शिमगा' असेही एक नाव आहे.
अशा या शीमग्याच्या नावाखाली सध्या नाशिककर एका विशेष आयोजनावरून शासनाच्या विरोधात (बे)सुर आळवताना दिसत आहेत. यामध्ये प्रामुख्याने सर्वच प्रकारची माध्यमं आघाडीवर आहेत, अर्थात यालाही अपवाद आहेतच. पण, हे अपवाददेखील 'उत्साह' कमी आणि 'बुरा न मानो होली है..'चीच भूमिका घेत आहेत. परिणामी, जे दुखावले गेले ते समाज माध्यमांचा वापर करत आहेत आणि जे अस्तित्व सिध्द करू पहात आहेत, ते कुणाच्या तरी खांद्यावर बंदुक ठेऊन आपल्या हक्काच्या व्यासपीठावर वीद्वत्तेचा आव आणत आहेत. मात्र या दोन्ही प्रयत्नांत खरी खदखद मात्र कुणीही समर्पकपणे मांडू शकलेले नाही. खरेतर हे एका अर्थाने बरेही झाले, कारण या लोकांना मुळात 'विश्व मराठी संमेलना'चा अर्थच कळालेला नाही. त्यातूनच या संमेलनाची तुलना अ. भा. मराठी साहित्य संमेलनाशी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. शिवाय, साहित्य क्षेत्रातील काही तथाकथित दिग्गज याच भावनेला खतपाणी घालत असुन बिचारे 'पत्रकार' बळीचा बकरा ठरत आहेत, आणि ज्यांना खरेच काही समजले त्यांचा मात्र कोंडमारा होत आहे. बरं या शर्यतीत 'नंबर वन' म्हणवणारी दैनिकंच पुढे आहेत, हे विशेष..!
वास्तविक, हा एकुणच 'इवेंट्' यथोचित पार पडला. राज्य सरकारच्या धोरणानुसार आणि या धोरणाला साजेसा हा सोहळा नाशिककरांनी आणि समस्त मराठीप्रेमींनी अनुभवला. आता एवढा मोठा व्याप म्हटल्यावर टीका, उलट्या प्रतिक्रिया, मानापमान, नकारात्मक सुर यासारख्या गोष्टी अपेक्षितच आहेत. त्याचवेळी राज्य शासनाचा हा भव्य उपक्रम नाशिकच्या भूमीत राबवला जाणे, याकडे जर आपण संधी म्हणुन बघितले तर मनात एकच प्रश्न येतो, तो म्हणजे 'हा शिमगा कशासाठी?' आणि या प्रश्नाचे उत्तरही सुज्ञ नाशिककर, जाणकार मराठी प्रेमी आणि सुसंस्कृत मराठी माणुस जाणुन आहे..!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा