मराठी अस्मिता..

मराठी अस्मिता आणि आम्ही...

कोणे एके काळी सदैव ऐरणीवर असणारा मराठी अस्मितेचा प्रश्न आज कुठे दिसत नाही. विशेषतः स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना अवघा महाराष्ट्र या एका प्रश्नावर एकवटलेला आपण बघितला आहे. त्यानंतरच्या काळात मात्र हा बाणा केवळ नावापुरताच अस्तित्व राखण्यासाठी धडपडताना दिसतोय. (मुंबई महापालिका निवडणुक काळात अनेकांना तसा उमाळा येईलही कदाचित; पण लोकसभा निवडणूकीत काय?).
अगदीच स्पष्ट बोलायचे तर, मराठी माणसाला ही अस्मिता काय असते हेच अद्याप समजलेले नाही, असे दिसते. त्यासाठी थोडं इतिहासात डोकावण्याची गरज आहे. आता इतिहास म्हणजे लगेच महाराजांचा इतिहास आठवण्याची गरज नाही. अगदी अलिकडचा काळ बघु या... अर्थातच वंदनीय बाळासाहेब आणि शिवसेना हे दोनच मुद्दे पुरेसे आहेत. मुंबई आणि राज्यातही आज जी काही मराठी कर्तबगारी शिल्लक आहे, तिच्या पाठीशी हे दोनच मुद्दे ठळकपणे दिसतात. त्यामुळेच आजही मराठी माणुस महाराजांनंतर बाळासाहेबांनाच मानतो. पण असे असले तरी महाराष्ट्राचे राजकारण मात्र त्यांच्या विचारांपासुन भरकटत आहे. विशेष म्हणजे असे भरकटत असतानाही हे राजकारण बाळासाहेब आणि महाराजांच्याच नावाचा आधार घेत आहे आणि हे उघड्या डोळ्यांनी पहात असुनही मराठी काळीज किंचितही थरथरत नाही, याचेच वाईट वाटते. कारण बाळासाहेबांनी 'दील्लीश्वरा'ला कधीच भीक घातली नाही (पक्ष कुठलाही असो) आणि आज त्याच महाराष्ट्रात याच 'दिल्लीश्वर' मंडळीची प्रचंड लुडबुड आपण मोठ्या उत्सुकतेने बघतोय. एवढेच नव्हे तर त्यांचा वारसा सांगणारे (ऊबाठा नव्हे) काही नेते उघडपणे दिल्लीत मुजरा करताहेत आणि सामान्य मराठी माणुस मात्र पुरता हतबल झालेला पाहुन दिल्लीश्वरलासुध्दा आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. एवढी लाचारी या महाराष्ट्राने यापुर्वी कधीच पत्करली नसेल. याच लाचारीला उद्देशून बाळासाहेबांनीच 'दिल्लिश्वर' हे नाव उपरोधिकपणे उच्चारले, हेदेखील आपण विसरलो की काय अशी शंका येते आणि त्यामुळेच येत्या काळात मुंबई महाराष्ट्रापासुन विलग होईल अशी भितीही वाटते. कारण मराठी अस्मितेची वाटचालच आज त्या दिशेने सुरू आहे, हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ चित्र आहे.. तेव्हा वेळ गेलेली नाही... मात्र सावध आणि जागे होण्याची ही निश्चितच योग्य वेळ आहे..

-ब्रिजकुमार परिहार, नाशिक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हा शिमगा कशासाठी ?

आम आदमी...

कसं व्हायचं ??,